महाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

‘मराठी भाषा समन्वय अधिकारी’ म्हणून विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची नियुक्ती..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १५ जानेवारी २०२५ मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार तसेच विकास करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशान्वये महापालिका स्तरावर विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची काल ‘मराठी भाषा समन्वय अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी भाषेच्या अंमलबजावणीसाठी समन्वय अधिका-यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून मराठी भाषा अधिकृत राजभाषा असल्याने महापालिकेच्या वतीने या भाषेचा प्रचार प्रसार विविध स्तरांवर करण्यासाठी ‘मराठी भाषा समन्वय अधिकारी ‘ म्हणून जबाबदारी विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे.
मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार, व विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षण व प्रशासकीय कामकाजाचेच नाही तर सर्व लोकव्यवहाराचे जास्तीत जास्त मराठीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी संवाद, संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन व्यवहारक्षेत्र निहाय शिफारसी अंतर्भूत असलेले मराठी भाषा धोरण शासनाच्या मराठी भाषा विभागाने दि. १४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने आगामी काळात मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण मराठी माध्यमात उपलब्ध करुन देणे, मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सर्वसामान्यांना समजेल अशा प्रशासकीय व्यवहाराची मराठी भाषा विकसित करणे, बोली भाषांचे जतन व संवर्धन तसेच मराठी भाषेला राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर महत्वाची भाषा म्हणून प्रस्तापित करणे आदी उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने या धोरणामध्ये शिफारसी प्रस्तावित केलेल्या आहेत. मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून मराठीतून कामकाज सक्षमपणे व अधिकाधिक परिणामकारकरित्या करण्यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असते. याकरिता प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना “मराठी भाषा दक्षता अधिकारी” म्हणून नेमण्यात आले आहे.
मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कार्यालयीन व्यवहार, सरकारी दस्तऐवज आणि दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करून मराठी भाषेच्या वापराबाबत असलेल्या सरकारी धोरणांची अंमलबजावणी देखील सुनिश्चित केली जाणार आहे. मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करणा-या उपक्रम आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देऊन मराठी भाषेचा प्रभावी वापर सुनिश्चित करून तिचे संवर्धन करण्याचा महापालिकेचा मानस असून समन्वय अधिकाऱ्यांमार्फत ही जबाबदारी पार पाडली जाणार आहे.
शासकीय पातळीवर आणि नागरिकांमध्ये मराठी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर मराठी साहित्य, कला, आणि संस्कृतीला पाठिंबा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. महापालिका कर्मचारी आणि अधिका-यांना मराठी भाषेतील कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून मराठी भाषेतील लेखन, अनुवाद, आणि अभिव्यक्तीसाठी साधने देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. महापालिका कार्यालयातील मराठी भाषेतील लेखन आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या अंमलबजावणीसंबंधी नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांची माहिती कर्मचा-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. तसेच महानगरपालिका कार्यालयांमध्ये मराठीचा वापर होत आहे की नाही याची तपासणी देखील समन्वय अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे. याशिवाय स्थानिक भाषा संघटनांशी समन्वय साधून मराठी भाषा संवर्धनासाठी देखील महापालिका प्रयत्न करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!