आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भारत आणि जपान मध्ये द्विभाषिक व्यावसायिकांना खूप मागणी – अच्युत कुमठेकर

पीसीयू मध्ये ‘डिस्कव्हर जपान’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

प्रतिनिधी पिंपरी, पुणे दि. ३ फेब्रुवारी २०२५ भारत आणि जपान मध्ये आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात द्विभाषिक व्यावसायिकांना खूप मागणी आहे. त्यामुळे पुढील काळात भारतीय भाषेसह जपानी भाषा अवगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतासह जपानमध्ये देखील करिअर आणि उद्योग व्यवसाय उभारण्यास खूप मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ उठवण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ बरोबर जपानी लँग्वेज टीचर्स असोसिएशन सारख्या अनेक संस्था एकत्र येऊन काम करीत आहेत. यामुळे भारत आणि जपान मध्ये उद्योग, व्यवसाय, रोजगार वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन्स मॅनेजर अच्युत कुमठेकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे ‘डिस्कव्हर जपान’ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. यावेळी जपानी लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ पुणे चे संस्थापक सदस्य हरी दामले, पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मनीमाला परी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, परदेशी भाषा समन्वयक डॉ. करुणा भोसले, एसजीएस एज्युनेट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक क्षिप्रा पोतदार, पिंपरी चिंचवड ओरिगामी सेंटरच्या प्रमुख स्वाती धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी हरी दामले यांनी जपानी भाषा शिकण्याचे महत्त्व, मराठीशी असलेले साम्य, कांजीचे महत्त्व आणि जपानमध्ये यशस्वी करिअर घडवणाऱ्या सांस्कृतिक पैलूंविषयी माहिती दिली.
पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर बहुभाषिक प्राविण्य मिळवून देण्यासाठी पीसीयू कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असे आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू करण्यास पीसीईटीचे विश्वस्त मंडळ नेहमीच पाठबळ देत आहे.
क्षिप्रा पोतदार यांनी विद्यार्थ्यांना क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन आणि सेन्सिटायझेशन या विषयावर माहिती देताना सांगितले की, जागतिक व्यावसायिक वातावरणात सांस्कृतिक समज खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
स्वाती धर्माधिकारी यांनी ओरिगामी सत्रात पारंपारिक जपानी हस्तकलेचे कलात्मक आणि ध्यानात्मक फायदे सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी भविष्यकाळात जागतिक स्तरावर कौशल्ये आणि सांस्कृतिक अनुकूलता असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी उद्योगांमध्ये वाढणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना जागतिक करिअरच्या संधी, परदेशी भाषा प्रवीणतेचे महत्त्व आणि क्रॉस-कल्चरल क्षमतांबद्दल ज्ञान देण्यासाठी पीसीयू मध्ये उत्कृष्ट नियोजन केलेले गतिशील उपक्रम आहेत. त्यामधे अनुभवी मार्गदर्शकांकडून जपानी भाषा शिकण्याचे फायदे, जपानमधील व्यावसायिक संधी आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धतेबद्दल मौल्यवान माहिती दिली जाते असे सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे आणि परदेशी भाषा समन्वयक डॉ. करुणा भोसले यांनी आयोजनात सहभाग घेतला.
स्वागत हरी दामले, सूत्र संचालन जपानी भाषा शिक्षक समिक्षा भोसले तर प्रियंका वायचळ यांनी आभार मानले.
पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी संयोजक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!