पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामाला नाही गती ! कशी होणार समाजाची प्रगती! सामाजिक कार्यकर्त्यांनी केले निषेधाचे आंदोलन !

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित स्मारकाच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल निषेध धरणे आंदोलन..
पिंपरी-चिंचवडमध्ये फुले स्मारकाच्या कामाला गती द्या; नागरिकांचा महापालिकेला आग्रह..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १ एप्रिल २०२५ – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामाबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या स्मारकाच्या उभारणीला २०२१ पासून सुरुवात झाली असली, तरी चार वर्षांनंतरही हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. याबाबत आज, १ एप्रिल २०२५ रोजी, नागरिकांनी महापालिका आयुक्तांना एक स्मरणपत्र सादर करत तातडीने आढावा बैठक घेण्याची मागणी केली आहे.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या परिसरात हे भव्य स्मारक उभारले जात आहे. यात फुले दांपत्याचा पूर्णाकृती पुतळा आणि त्यांच्या जीवनावर आधारित आकर्षक ‘फुले सृष्टी’ उभारण्याचा मनोदय आहे. मात्र, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून कामाला गती मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. “स्मारकाचे काम संथ गतीने सुरू आहे, दर्जाही निकृष्ट दिसतोय. महामानवाच्या स्मारकात तडजोड होता कामा नये,” असे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.
शिवाय, या परिसरात कचरा साचणे, मद्यपानाच्या घटना घडणे आणि सुरक्षा रक्षकांचा अभाव यामुळे स्मारकाच्या पावित्र्याला धक्का बसत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. “सुरक्षा रक्षक नेमले असूनही एकही रक्षक वेळेत उपस्थित दिसत नाही. परिसराची अवस्था बिकट झाली आहे,” अशी खंत स्थानिक रहिवासी आनंदा कुदळे यांनी व्यक्त केली.
नागरिकांनी मागणी केली आहे की, आयुक्तांनी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासह तातडीने बैठक घ्यावी. यात स्मारक समिती, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी संघर्ष समिती आदींचा समावेश करून कामाची सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी ठोस निर्देश द्यावेत. “११ एप्रिल २०२५ रोजी महात्मा फुले जयंतीदिनी फुले सृष्टीचे भव्य उद्घाटन व्हावे, ही आमची अपेक्षा आहे,” असे विशाल जाधव यांनी सांगितले.
यापूर्वी २० मार्च २०२५ रोजीही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. “आमचा संयम आता संपलाय. महापालिकेने त्वरित पावले उचलावीत,” असे शंकर लोंढे यांनी ठणकावले. या स्मरणपत्रावर आनंदा कुदळे, विशाल जाधव, शंकर लोंढे, सुरेश गायकवाड, निखिल दळवी, ऍड. विद्या शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या स्मारकाला आता तरी गती मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.