अवैधआंदोलनदेश-विदेशपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पत्रकारांना अर्वाच्य शिवीगाळ व धमकी; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा-सायली नढे

पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेसची आक्रमक मागणी; पोलीस आयुक्तांना सादर केले निवेदन..

प्रतिनिधी ​पिंपरी चिंचवड दि. २७ जून २०२६ लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संवाद साधणारे आणि त्यांना उघडपणे धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. सायली नढे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आणि विविध वृत्तवाहिन्यांवर खासदार संजय दिना पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खासदार महोदय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना अत्यंत अर्वाच्य, अश्लील भाषा वापरताना दिसत आहेत. केवळ शिवीगाळच नव्हे, तर ‘पत्रकारांना मारून पाठवेन’ अशी धमकीही त्यांनी दिली आहे. या घटनेमुळे पत्रकार वर्गामध्ये आणि सुजाण नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सायली नढे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न सोडवणारी व्यक्ती जेव्हा भररस्त्यात पत्रकारांना शिवीगाळ करते आणि जीवे मारण्याची धमकी देते, तेव्हा ही लोकशाहीची थट्टा आहे. एका लोकप्रतिनिधीकडून अशा अशोभनीय वर्तनाची अपेक्षा नसते.”

खासदारांच्या या वर्तनामुळे केवळ पत्रकारांचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अपमान झाला आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच पायबंद घातला नाही, तर भविष्यात लोकशाही मूल्यांना मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे या घटनेची चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

​निवेदन सादर करतेवेळी अभिमन्यू दहीतुल्य माजी सभापती, ॲड.उमेश खंदारे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस, प्रियंका सगट, राहुल शिंपले, स्वाती शिंदे, आशा भोसले, ॲड.प्रियंका ढगे, प्रज्ञा जगताप व महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आता या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!