आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

व्यसनमुक्ती अभियाना करिता सर्वपक्षीय बैठक उत्साहात संपंन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ जून २०२५ पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या अवैध व्यवसायांविरोधात आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून “व्यसनमुक्ती अभियान” अंतर्गत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक काल दिनांक ११ जून २०२५ रोजी बालाजीनगर, भोसरी येथील बूद्ध विहारात संपन्न झाली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड होते. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्ते, समाजसेवक आणि विविध पक्षांतील नेत्यांनी एकमुखाने व्यसनमुक्ती आणि अवैध धंद्यांविरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी प्रा. बी. बी. शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ही या विषयासंदर्भातील दुसरी बैठक असून, शासन महसुली उत्पन्नासाठी अप्रत्यक्षपणे व्यसनांना प्रोत्साहन देत आहे, तर अवैध धंद्यांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पिंपरी चिंचवड क्षेत्रातील ७२ अधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये मुख्यतः बहुजन समाज वास्तव्यास असून, याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि होतकरू तरुण पिढी व्यसनांच्या गर्तेत अडकली आहे.
याच पार्श्वभूमीवर सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भिमसृष्टी पिंपरी येथे प्राणांतिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपोषणापूर्वी संबंधित शासकीय अधिकारी व यंत्रणांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त, समाजकल्याण आयुक्त व जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे.
प्रा. बी. बी. शिंदे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना या व्यसनमुक्ती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या बैठकीस शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ विचारधारेवर कार्य करणारे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये बापूसाहेब जगदाळे, ज्ञानेश्वर (माऊली) बोराटे, मुकुंद रणदिवे, उत्तम कांबळे, सागर ओरसे, विठ्ठल लांडगे, कृष्णा सरवदे, कवी गोविंद गाडे, सुरज गायकवाड, रामभाऊ ओव्हाळ, पांडुरंग भांडेकर, मा. तुकाराम गव्हाणे, गणेश दिवेकर, आयु. शालनताई ओव्हाळ, आयु. सिमाताई गजभिये, आयु. सावित्रिबाई शिंदे यांचा सहभाग होता.
सर्वांनी आपल्या मनोगतातून या अभियानाला संपूर्ण पाठिंबा दर्शवत तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा. सागर ओरसे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, पिंपरी चिंचवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, “भिमसृष्टी” पिंपरीत होणार्‍या उपोषणाची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!