देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“तुळजाभवानीच्या मूर्तीच्या बदलावरून वादंग; संभाजी ब्रिगेड आक्रमक”

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २७ जून २०२५ श्री क्षेत्र तुळजापूर येथे उभारण्यात येत असलेल्या १०८ फूट उंचीच्या शिल्पामध्ये तुळजाभवानी मातेचे अष्टभुज (आठ हातांचे) रूप दाखवण्यात आले असून, हे मूळ परंपरेला इतिहासाला व जनश्रद्धेच्या विरोधात आहे, असा आरोप करत संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत सध्या १०८ फूट उंच शिल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी माता भवानी तलवार देत आहेत, हा ऐतिहासिक व भक्तीपूर्ण क्षण दाखवण्यात आलेला आहे याबद्दल संभाजी ब्रिगेड समाधान व्यक्त करीत आहे. परंतु अत्यंत दुःख आणि तीव्र संतापाने नमूद करावे वाटते की, या शिल्पामध्ये तुळजाभवानी मातेचे अष्टभुजाकृती (आठ हातांचे) रूप दाखवण्यात आले आहे, जे की श्री क्षेत्र तुळजापूरच्या मूळ परंपरेला, इतिहासाला, शास्त्राला आणि जनश्रद्धेच्या पूर्णतः विरोधात आहे श्री क्षेत्र तुळजापूर येथील मूळ मूर्ती ही द्विभुज रूपातील (फक्त दोन हातांची) असून तीच परंपरागत व मान्य स्वरूप आहे. इतिहास अभ्यासक, पुजारी मंडळ, स्थानिक मंदिर संस्थान, विविध सामाजिक आणि धार्मिक संघटना तसेच हजारो तुळजाभक्तांनी याविरोधात तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे. नुकतेच या संदर्भातील संकल्पचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे संकल्पचित्र देवीच्या मूळ स्वरूपाविरोधात असून धार्मिक व ऐतिहासिक सत्यता मोडीत काढणारे आहे. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यामुळे श्रद्धेच्या बाबतीत चुकीची माहिती प्रसारित होऊन, याने धार्मिक भावना दुखावल्या जात असून हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून अवमानकारक आहे दरम्यान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पुजारी मंडळाला पाठवलेल्या अधिकृत पत्रात, तुळजाभवानी आईचा ‘भारत माता’ असा उल्लेख करण्यात आला आहे. इतिहासात देवी तुळजाभवानीचा भारत माता म्हणून उल्लेख आढळत नाहीत. हे अत्यंत खेदजनक, ऐतिहासिकदृष्ट्या अप्रामाणिक आणि श्रद्धेला धक्का देणारे आहे. अत्यंत स्पष्ट शब्दांत संभाजी ब्रिगेड पुढील मागण्या करीत आहे सदर शिल्पामधील अष्टभुज प्रतिमा त्वरित रद्द करून, तुळजापूरच्या मूळ स्वरूपानुसार द्विभुज तुळजाभवानी मातेचे शिल्प साकारण्यात यावे. या प्रकल्पात कोणताही धार्मिक विकृतीकरण किंवा चुकीचे चित्रण होणार नाही, यासाठी तत्काळ एक अभ्यास समिती नेमावी ज्यात स्थानिक मंदिर संस्थान, पुजारी मंडळ, इतिहास अभ्यासक आणि तुळजाभक्तांचा समावेश असावा. इतिहासात, शास्त्रात किंवा प्रचलित धार्मिक परंपरेत तुळजाभवानी मातेचा ‘भारत माता’ म्हणून उल्लेख आढळत नाही. ‘भारत माता’ ही संकल्पना प्राचीन नाही, ती आधुनिक राष्ट्रवादाशी संबंधित आहे. तुळजाभवानी माता, दुर्गा, पार्वती यांसारख्या पारंपरिक देवता या विशिष्ट धार्मिक परंपरेत आहेत, तर भारत माता ही एक राष्ट्रप्रतिमा (symbolic personification of India) आहे. त्यामुळे तुळजाभवानी मातेचा ‘भारत माता’ म्हणून उल्लेख करणे ऐतिहासिकदृष्ट्या अयोग्य व अप्रामाणिक आहे. अशा प्रकारचा उल्लेख भाविकांमध्ये चुकीचा समज व गोंधळ निर्माण करणारा आहे. या चुकीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. हे केवळ एका मूर्तीचे किंवा शिल्पाचे प्रकरण नाही, हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, इतिहासाचे आणि आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. या बाबतीत तातडीने योग्य तो निर्णय न घेतल्यास भावी काळात मोठ्या प्रमाणावर सामाजिक असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन श्रद्धा आणि इतिहासाचा सन्मान राखाल हीच अपेक्षा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यात तीव्र जन आंदोलन छेडावे लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे. सदर निवेदनावर पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते सचिव नकुल भोईर कार्याध्यक्ष विशाल मिठे उपाध्यक्ष निरंजन सोखी संघटक गणेश देवराम यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!