
प्रतिनिधी पाथर्डी दि. १८ ऑगस्ट २०२५ पाथर्डी शहरात परप्रांतीय वस्तुविक्रेत्यांचे अपहरण करून लुटमारी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी फक्त २४ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उत्तर प्रदेशातील अजयसिंग रजसिंग नायक, सुनिलकुमार छतरसिंग नायक व यादसिंह बालकिशन नायक हे आपल्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्स (UP-77-AU-2919) गाडीतून पाथर्डीत वस्तू विक्रीसाठी आले होते. यावेळी नऊ जणांच्या टोळीने त्यांचे अपहरण करून दमदाटी व मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन मोबाईल, गॅस शेगड्या, होमथिएटर, कुलर अशी एकूण ४९ हजार रुपयांची मालमत्ता लुटली तसेच एका साक्षीदाराकडून जबरदस्तीने Google Pay द्वारे ७,५०० रुपये हस्तांतरित करून घेतले. अपहरणानंतर आरोपींनी पीडितांना त्यांच्या गाडीत बसवून पाथर्डी-अहिल्यानगर रोडवर नेत असताना आरोपींकडील गाडी भरधाव वेगाने चालवून समोरून येणाऱ्या किया गाडीला जोरदार धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले व प्रवासी जखमी झाले.
घटना घडताच पाथर्डी पोलिसांनी चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. केवळ २४ तासांत मुख्य सूत्रधार अंकुश नवनाथ मडके (वय ३६, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) याला अटक करून उर्वरित आरोपींची नावे उघडकीस आली. त्यानंतर शुभम अंबादास कराड (२३), केतन दिगंबर जाधव (२९) व सुहास काशिनाथ ढाकणे (३४) यांना अटक करण्यात आली. चौघांनाही न्यायालयात हजर केले असता २० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी केतन जाधव हा कुख्यात सराईत गुन्हेगार असून याच्यावर यापूर्वीच खून, दरोडा, अपहरणासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाथर्डी पोलीस स्टेशन गु. र. नं. 215/2021, गु. र. नं. 204/2022 तसेच ए.पी.एस.सी. ठाणे पोलीस स्टेशन गु. र. नं. 128/2017 या प्रकरणात तो वॉंटेड होता.
ही कारवाई मा. सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), मा. वैभव कलबुते (अपर पोलीस अधीक्षक), मा. उगले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोसई विलास जाधव, संदिप ढाकणे, महादेव गुट्टे, निवृत्ती आगरकर, स.फौ. नितीन दराडे, पोहेकॉ बाबासाहेब बडे, पोकॉ ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, संजू जाधव, ज्ञानेश्वर सानप, इजाज सय्यद, संदिप बडे, अल्ताफ शेख व मपोका सुरेखा गायकवाड यांचा समावेश होता.
फक्त २४ तासांत आरोपींना गजाआड करून पाथर्डी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन करताना शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.



