मनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“गुड समॅरीटन ग्रुपने घडवली अनाथ मुलांना रॅम्बो सर्कसची सफर”

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ सप्टेंबर २०२५ लहान थोरांना सर्कसचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ते हा आनंद आवर्जून घेऊ शकतात, पण जो दुर्बल घटक आहे, जे वंचित लहान लेकरे हा आनंद अनुभवू शकत नाही अशा मुलांना हा आनंद आपण कसा देऊ शकतो याची खंत “गुड समॅरीटन ग्रुप” मधील सदस्यांना पडली. त्यांनी सदर बाब विषयी सामाजिक कार्यकर्ते मा. राजन नायर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी रॅम्बो सर्कसचे मॅनेजर राजू आयझॅक यांच्याशी संपर्क साधून या मुलांसाठी विशेष मोफत शो करिता परवानगी घेतली.
करुणा आणि सामुदायिक सेवेच्या हृदयस्पर्शी कृतीतून, “गुड समॅरीटन” ग्रुपने रॅम्बो सर्कसचा थरार अनुभवण्यासाठी खडकी व भोसरी येथील लेबर कॅम्प मधील अनाथ मुलांना घेऊन जाऊन तो आनंद आणि थरार अनुभवयास दिला, सोबतच खुसखुशीत खाऊ देखील त्यांना देण्यात आला.
४० मुलांची संख्या असलेल्या या गटाला वंचित पार्श्वभूमीतील मुलांचा समावेश होता. सर्कसमध्ये मजा, उत्साह आणि संस्मरणीय क्षणांचा दिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश आव्हानात्मक परिस्थितींना तोंड देणाऱ्या मुलांना आनंद आणि एक अनोखा अनुभव देणे हा होता.
मुलांनी सर्कसमधील चित्तथरारक कसरती, जोकरांचा हास्यविनोद आणि मनोरंजनाचा पुरेपूर आनंद घेतला, त्यामुळे त्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय अनुभव निर्माण झाला. गुड समॅरीटन ग्रुप समाजातील वंचित मुलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना आधार देऊन, स्वच्छता, सुरक्षा व जीवनावश्यक धडे देण्याचे असे उपक्रम नेहमीच राबवित असतात.
“रॅम्बो सर्कसला भेट देऊन या मुलांमध्ये हास्य आणि आनंद आणण्याच्या दिशेने एक छोटेसे पाऊल होते” असे बन्यामीन काळे यांनी प्रसार माध्यमाला सांगितले. डेव्हिड काळे यांनी जनतेला आव्हान केले की, सर्कस मधील कलाकारांना उत्तेजन देण्यास, तो थरार अनुभवयास व ही संकल्पना जिवंत ठेवण्यास प्रत्येकाने ही सर्कस पाहावी. सॅमसन चोपडे यांनी मा.राजन नायर सर आणि रॅम्बो सर्कसचे मॅनेजर, सर्व कलाकार व व्यवस्थापनचे आभार मानले.
हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यास बन्यामीन काळे, डेव्हिड काळे, सॅमसन चोपडे, मंजुला नायडू, सॅम्युएल काळे आणि स्तवन काळे यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!