मोशी येथील स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटीचा पाणी प्रश्न पेटणार-सारीकाताई बोऱ्हाडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ जानेवारी २०२४ स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी मध्ये तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ही पाणी टंचाई दूर करून स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटीचा पाणी प्रश्न आयुक्तांनी दूर करावा, अन्यथा महानगर पालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मा.नगरसेविका सारीकाताई बोऱ्हाडे यांनी आयुक्तांना दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोशी येथील बोराडेवाडी भागातील महानगर पालिकेच्या या प्रकल्पात १४ मजली ०६ इमारती अनुक्रमे A, B, C, D, E, F, अशा इमारती असून, एकूण १२८८ सदनिका आहेत. साधारणता ०४ ते ०५ हजार लोक वस्ती येथे आहे, राहायला आल्यापासून रोज कुठल्यातरी नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. समस्येशी निगडित अधिकार्यांना वारंवार सांगून ही कुठल्याही समस्येचे निवारण होत नाही. त्याचप्रमाणे पाणी टंचाईचा प्रश्न ही वाढत चालला आहे. ३-४ महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या खूप भीषण झाली आहे. आपण
एका व्यक्तीला १३० लिटर पाणी रोज वापरण्यासाठी पकडल तरी घरात ०४ लोक समजून एका घराला ५२० लिटर पाणी लागते. ५२० लिटर गुणिले २१६ फ्लॅट आहेत, म्हणजेच आपल्याला एका बिल्डिंगला साधारणता ११२३२० लिटर एवढे पाणी पाहिजे आणि त्यात एक दिवसा आड पाणी येते म्हणजे ते झाले २२४६४० लिटर पाणी. पण पाणी येते किती तर २५००० लिटर ,४०००० लिटर, खूप झाले तर ७०००० हजार लिटर, मग कस काय पुरणार पाणी त्यामुळे येथील रहिवाशांना पिण्यासाठी, वापरण्यासाठी चक्क टॅंकरने पाणी मागावे लागत आहे. पाणी प्रश्न एवढा गंभीर होत चालला आहे की चक्क नागरिकांना काम धंदा सोडून, इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांकडून पैसे जमा करून, टँकरचे पाणी भरावे लागते. त्यामुळे स्वतः आयुक्त साहेबांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालणं आवश्यक असून, त्यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची विनंती येथील नागरिकांनी मा. नगरसेविका सारीकाताई बोऱ्हाडे यांचे माध्यमातून आयुक्तांना केली आहे, प्रशासकांनी या सर्व परिसराचा आढावा घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून नवीन पाइप लाईनची मागणी मान्य करून, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मा.आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढू असा इशारा मा.नगरसेविका सारीकाताई बोऱ्हाडे यांनी आयुक्तांना दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे व सहा इमारतीतील सर्व रहिवाशी उपस्थित होते.






