गून्हानाशिकपोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मालेगाव कनेक्शन उघड : १० कोटींच्या हशीश ऑइलचा साठा पकडला, आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घणाघात..

प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि. २३ मार्च २०२६ धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे उघडकीस आलेल्या १० कोटींच्या हशीश ऑइल प्रकरणाने राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याचा विदारक चेहरा पुन्हा एकदा समोर आणला आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई केवळ एक जप्ती नसून, कायद्याला आव्हान देणाऱ्या आंतरराज्य ड्रग्ज माफियांच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे.

तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर नियमित नाकाबंदी दरम्यान संशयित कार (एमएच १२ जीव्ही १५१७) थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी थेट पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेपुढे त्यांची युक्ती फसली. पाठलागादरम्यान गाडीतून फेकण्यात आलेल्या बॅगेतून सुमारे १० किलो हशीश ऑइल जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार या मालाची किंमत १० कोटी ३० लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा क्रमांक (FIR No.) ४५/२०२६ नोंद करण्यात आला असून कलम ८(क), २०(ब), २२ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे अधिक कडक केली आहेत.

तपासाची दिशा पुढे नेत पोलिसांनी थेट नाशिक जिल्ह्यातील मालेगाव गाठले आणि वसीम इंद्रिस शहा (३३) व मोसीन हयात खान (३९) या दोघांना अटक केली. विशेष म्हणजे हे आरोपी केवळ वाहतूकदार नसून या रॅकेटमधील सक्रिय दुवे असल्याचे स्पष्ट होत आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे गांजाच्या झाडापासून उच्च प्रतीचे हशीश ऑइल तयार केले जात होते. हे ऑइल मालेगावमध्ये आणून त्यावर प्रक्रिया करून अधिक घातक स्वरूपातील ड्रग्ज तयार केले जात होते. म्हणजेच, एका राज्यात उत्पादन आणि दुसऱ्या राज्यात प्रक्रिया-असा संगनमताने चालणारा हा बेकायदेशीर उद्योग पोलिसांनी उघड केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात मालेगाव कनेक्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. मसूद खान (४५, रा. मालेगाव) हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असून तो सध्या फरार आहे. त्याच्यावर खुनासह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकीकडे कायद्याचा धाक दाखवला जात असताना दुसरीकडे असे सराईत गुन्हेगार खुलेआम ड्रग्ज नेटवर्क चालवत असल्याचे वास्तव चिंताजनक आहे.

पोलिसांनी नळदुर्ग ते मालेगाव दरम्यानच्या तब्बल ८ टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा अचूक मागोवा घेतला. कारच्या मालकाने ती कार १५ दिवसांपूर्वी विकल्याचे सांगितले असले तरी, या व्यवहारामागील साखळी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, आयपीएस अधिकारी मेघना एन, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पंकज देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. मात्र प्रश्न अजूनही कायम आहे—इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज व्यवहार होत असताना स्थानिक पातळीवर कोणाचा आशीर्वाद या रॅकेटला मिळत होता?

सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिस कोठडी सुरू असून पुढील चौकशीतून या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी जाळे आवळले असले तरी, या ‘काळ्या व्यवसायाची’ मुळे किती खोलवर रुजली आहेत, याचे उत्तर पुढील तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!