अभिनंदनआरोग्यमहाराष्ट्रमूंबईसामाजिक

घारापुरी बेटावर पर्यावरण संवर्धनचा कार्यक्रम विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १६ मार्च २०२६ मुंबई जवळील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात अरबी समुद्रात वसलेले ऐतिहासिक घारापुरी बेट येथे पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने समुद्रकिनारा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. वनशक्ती , सागरशक्ती, महाराष्ट्र वनविभाग, कांदळवन कक्ष, दिवाले गाव ग्रामस्थ, गव्हाण कोळीवाडा ग्रामस्थ व शेवा कोळीवाडा तसेच स्थानिक मच्छीमार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या स्वच्छता मोहिमेत सुमारे ५० स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मोहिमेदरम्यान बेटावरील किनाऱ्यालगत साचलेला सुमारे ३५०० ते ४००० किलो पर्यंत अविघटनशील कचरा गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला. समुद्रातून वाहत येणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल, काचेच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे बेटाचे पर्यावरण आणि सौंदर्य धोक्यात येत असल्याने या स्वच्छता मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या उपक्रमात स्थानिक मच्छीमार देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रात साचणारा प्लास्टिक आणि घनकचरा यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात कचरा अडकतो, मासळीचे प्रमाण कमी होते तसेच बोटींच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे समुद्रातील कचरा हा स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणारा गंभीर प्रश्न बनला आहे. स्वच्छता मोहिमेमुळे या समस्येबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
घारापुरी बेट हे युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध एलिफंटा लेण्यांमधील पाषाणशिल्पे इ.स.च्या ९ व्या ते १३ व्या शतकातील अद्वितीय शिल्पकलेचे दर्शन घडवतात. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारसा स्थळाचे संवर्धन, समुद्री परिसंस्थेचे संरक्षण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यास मोठी मदत झाली.
श्री. सोनवणे, (वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष)
“घारापुरीसारख्या ऐतिहासिक आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या बेटावर स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि स्वयंसेवकांमध्ये पर्यावरणाबद्दलची जबाबदारी वाढण्यास मदत होते.”
श्री. कोकरे, ( वनपरिक्षेत्र अधिकारी)
“समुद्रातून वाहत येणारा प्लास्टिक कचरा हा किनारी परिसंस्थेसाठी मोठे आव्हान आहे. अशा स्वच्छता मोहिमांमुळे समुद्रकिनारी परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत होते आणि स्थानिक मच्छीमारांनाही याचा थेट फायदा होतो.”
नंदकुमार पवार, प्रकल्प समन्वयक, सागरशक्ती –
“घारापुरी बेट हे केवळ पर्यटन स्थळ नसून सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारसा आहे. स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने अशा मोहिमा नियमितपणे राबवल्यास समुद्री परिसंस्था अधिक सुरक्षित आणि स्वच्छ ठेवता येईल.” अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम हा एखाद्या समुद्रातील बेटावर वनशक्ति/ सागरशक्ति यांच्या द्वारे यशस्वीपणे राबवण्यात आला त्यास स्थानिक पारंपारिक मच्छिमार समाज आणि त्यास क्षेत्रीय वन विभाग व कांदळवन कक्ष यांनी मोलाची साथ दिली. भविष्यात अशाप्रकारे रायगड जिल्ह्यातील समुद्रातील अनेक बेटांवर स्वच्छता मोहिमा राबविण्याचा मानस श्री नंदकुमार पवार यांनी व्यक्त केला. कृपया प्रत्येकाने आपल्या परिसराची स्वच्छता ठेवा, निसर्ग व पर्यावरण टिकवा. असा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!