मोशी कचरा डेपोतील डोंगर कोसळून ११ कामगार ढिगाऱ्याखालीआम आदमी पार्टीचा आयुक्तांना १० तातडीच्या मागण्यांचे निवेदन – युद्धपातळीवर बचावकार्याची मागणी

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १० जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कार्यालयावर कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत २३ पैकी १८ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील ७ जणांची सुटका झाली असून ११ कामगार अजूनही बेपत्ता आहेत.
ही दुर्घटना म्हणजे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभार आणि कामगारांच्या सुरक्षेकडे झालेल्या बेजबाबदार दुर्लक्षाचा परिणाम आहे, असा आरोप आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहरने केला आहे.
आज AAP च्या शिष्टमंडळाने मा. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना निवेदन देऊन १० तातडीच्या मागण्या केल्या आहेत.
आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या:
१) युद्धपातळीवर बचावकार्य: NDRF, लष्कर, अग्निशमन दलाच्या मदतीने उर्वरित 11 कामगारांना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढावे. बचावकार्याचा दर तासाला अहवाल सार्वजनिक करावा.
२) उच्चस्तरीय चौकशी: CPCB ने नोव्हेंबर २०२४ मध्येच SWM नियम भंगाबद्दल नोटीस दिली होती. तरीही कारवाई का झाली नाही? १५ दिवसात चौकशी अहवाल जाहीर करावा.
३) दोषींवर कारवाई: डेपोची सुरक्षा आणि इमारतीची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर BNS कलमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
४) पीडितांना भरपाई: मृत्यू झाल्यास ₹ ५० लाख, गंभीर जखमींना ₹ १० लाख आणि कुटुंबातील एकाला नोकरी. उपचाराचा सर्व खर्च PCMC ने करावा.
५) मोशी डेपो बंद करण्याचा टाइमबाउंड प्लॅन: पुढील २ वर्षात मोशी डेपो टप्प्याटप्प्याने बंद करून १००% कचरा प्रक्रिया करावी.
६) कामगार सुरक्षा कायदा: सर्व कंत्राटी कामगारांना ESI, विमा, PPE किट आणि प्रशिक्षण सक्तीचे करावे.
शहर अध्यक्ष वैजनाथ शिरसाट आणि महासचिव स्वप्निल जेवळे म्हणाले, “कचऱ्याच्या डोंगरांवर कार्यालय बांधून प्रशासनाने कामगारांच्या जीवाशी खेळ केला आहे. ही दुर्घटना खून आहे. जर ७ दिवसात ठोस निर्णय नाही झाला तर आम आदमी पार्टी पालिका मुख्यालयावर तीव्र आंदोलन करेल.”
पालिकेने मोशी येथील सर्व कचरा डोंगरांचे ड्रोन सर्वेक्षण करून धोकादायक ढिगारे तातडीने हटवावेत, अशीही मागणी करण्यात आली.



