सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनतर्फे आकुर्डी येथे वारकऱ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे मोफत औषधोपचार आरोग्य शिबिर संपन्न..

प्रतिनिधी-नवनाथ बी सोनवणे पुणे दि. ११ जुलै २०२६ आषाढी वारीसाठी पायी दिंडीतून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनतर्फे दरवर्षी प्रमाणे आज पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
भर पावसात मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना पायाला फोड येणे, सर्दी-खोकला, ताप आणि थकवा अशा तक्रारी होऊ नयेत यासाठी फाउंडेशनच्या वतीने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत औषधोपचार करण्यात आले. त्याचबरोबर वारीच्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी महाप्रसाद म्हणून अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाला वारकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. पावसाची तमा न बाळगता फाउंडेशनचे पदाधिकारी दिवसभर सेवेत तत्पर होते.
या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. ओमकार चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, लताबाई चव्हाण, संगीता बोरुडे, डॉ.लक्ष्मण, डॉ.हर्षाली डॉ.सोनाली बिरादार, रमण बिरादार यांनी सर्वांनी मिळून भर पावसात अथक परिश्रम घेत हा सेवा उपक्रम यशस्वी केला.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे आणि वारीसारख्या सांस्कृतिक परंपरेला हातभार लावणे हे फाउंडेशनचे ध्येय असल्याचे यावेळी अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.



