जागतिक धम्म केंद्र कान्हेरी बुद्ध लेणी, बोरिवली येथे ‘महावर्षावास सोहळा उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ सप्टेंबर २०२६ स्वाभिमानी प्रतिष्ठान आदर्श नगर, मोशी, पुणे. आयोजित ऐतिहासिक आणि जागतिक वारसा लाभलेल्या कान्हेरी बुद्ध लेणी, बोरिवली येथे पवित्र वर्षावास व श्रावण पौर्णिमेनिमित्त ‘महावर्षावास सोहळा’ रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत मंगलमय आणि धम्ममय वातावरणात पार पडला. राज्यभरातून आलेल्या दोनशे हून अधिक निष्ठावंत बौद्ध अनुयायांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे नेतृत्व आदरणीय भन्तेजी धम्मानंद (पुणे) यांनी केले. सुरुवातीला सामूहिक बुद्ध वंदना, त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून परिसरामध्ये धम्मऊर्जा निर्माण करण्यात आली. त्यानंतर भन्तेजी धम्मानंद यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रबोधनात्मक धम्मदेशनेतून श्रावण पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. क्रूर अंगुलिमालाचे तथागत बुद्धांच्या करुणेने भिक्खूमध्ये झालेले परिवर्तन आणि महाकश्यप यांच्या ऐतिहासिक नेतृत्वात पार पडलेली ‘पहिली धम्म संगिती’ यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला.
कान्हेरीच्या प्राचीन वैभवाचे दर्शन.
या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट स्कॉलर व लेणी तज्ज्ञ आयु. सुरज रतन जगताप यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी कान्हेरी लेण्यांचा प्राचीन जागतिक इतिहास, तत्कालीन धम्म संस्कृती, बौद्ध स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये आणि या लेण्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व उलगडून दाखवत उपस्थितांना प्राचीन समृद्ध वारशाची प्रचिती दिली.
विविध संस्थांचा एकजूट सहभाग महाराष्ट्रातील बौद्ध वारसा संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांनी या सोहळ्यात एकत्र येत आपली सक्रिय उपस्थिती नोंदवली:
आयोजक स्वाभिमानी प्रतिष्ठान, आदर्शनगर, मोशी पुणे, बुद्ध लेणी संवर्धन समिती मुंबई, सेव्ह बुद्धा केव्हज पुणे, धम्म मेत्ता संघ, नवी मुंबई, संघमित्रा महिला लेणी संवर्धक पुणे, जाणीव फाउंडेशन पुणे, बुद्धलेण्या अभ्यास व प्रचार समिती पुणे, तथागत ग्रुप पुणे, शताब्दी बुद्ध विहार (रेंजहिल्स, पुणे), कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक टीम.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य समन्वयक धमसेवक राजू कांबळे, अर्जुन काटे, दिपक गायकवाड, विजय खुडे, अर्जुन काटे, मायाताई कांबळे, राजू भालेराव, मनोज गजभार, रवी कांबळे, अमित कदम यांनी चोख नियोजन केले. तसेच नरेंद्र प्रगणे, मच्छिंद्र अष्टगे, ज्ञानेश्वर दांडगे, सुभाष वाकळे गुरुजी, रमेश केदारी, अशोक तुपसौंदर, ॲड. प्रताप जाधव, गजानन वारूळे, निरंजन वानखेडे गुरुजी, उमेश रोकडे, शुद्धोधन बागडे गुरुजी आणि बुवासाहेब अहिवळे गुरुजी यांच्यासह अनेक धम्मप्रेमी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच धम्म सेविका अर्चनाताई कांबळे, मायाताई प्रगने, सुमित्रा अष्टगे, वैशाली आठवले, यांनी खूप मोठे सहकार्य केले.
याच प्रमाणे झेन अल्फा. टीमचे कॅप्टन प्रणय आठवले, अजय रत्न वाकळे, रोहन गवई, अभी पांडे यांनी धम्म सहलीसाठी खूप मोठे कष्ट घेतले.
अजून काटे सरांचे विशेष आभार त्यांच्यामुळेच मुख्य गेट इंट्री फी व लेणी पायथ्याशी बस नेण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्यामुळे सर्वांचे खूप मोठे आर्थिक दान वाचले.
जागतिक शांततेसाठी तथागत बुद्धांचा धम्म पुन्हा एकदा गतिमान करण्याचा आणि प्राचीन लेणी वारसा जतन करण्याचा सामूहिक संकल्प करत सर्व उपासक-उपासिकांनी या महावर्षावास सोहळ्याची सांगता केली.



