अंधश्रद्धाअमरावतीअवैधगून्हामहाराष्ट्रविशेषसामाजिक

अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीत संशयास्पद पूजाविधी; पाच जण ताब्यात..

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची काही तासांत कारवाई; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा..

प्रतिनिधी अविनाश गोंडाणे अमरावती दि. १९ सप्टेंबर २०२६ अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी संशयास्पद पूजाविधी केल्याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी पाच जणांना काही तासांत ताब्यात घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये निलेश मनोहरराव सोनटक्के (३४, रा. संतोषीनगर, विलासनगरच्या मागे, गल्ली क्रमांक १, अमरावती), सुबोध प्रकाश भोयर (३०, रा. उदखेड, पोस्ट पार्डी, अमरावती), आशुतोष महादेव तायडे (३०, रा. समता निवास, गोमाजीनगर, कौलखेडा, अकोला), साहेबराव पांडुरंग गायकवाड (५६, रा. समतानगर, सोमाटने, ता. मावळ, जि. पुणे; ह.मु. उल्हासनगर, ठाणे) आणि चंदु गणेशलाल गुप्ता (४३, रा. कुंभारपुरा, ब्राम्हणवाडा थडी) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महेंद्र राजू गवळी (२७) याचा मृत्यू झाल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता हिंदू स्मशानभूमीत त्याचा दफनविधी करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मृताच्या मित्राने फोन करून स्मशानभूमीत कोणीतरी पूजाविधी केल्याचे दिसत असल्याची माहिती नातेवाइकांना दिली.

त्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दफनविधी केलेल्या ठिकाणी तंबाखू, चार अगरबत्त्या, माचिस, फुटाणे, अत्तराची छोटी बाटली आणि काळी टोपी असे साहित्य आढळले. तसेच स्मशानभूमीच्या कंपाउंडलगत लाल रंगाची हुंदाई अ‍ॅक्सेंट चारचाकी (एमएच ०३ सीएच २६६५) उभी असल्याचे आढळले. या प्रकाराबाबत संशय व्यक्त करीत फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली.

या तक्रारीवरून ब्राम्हणवाडा थडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६१/२०२६, कलम ३(१), ३(२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध घेतला आणि काही तासांत पाच जणांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाने, अप्पर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहाय्यक पोलिस अधीक्षक ईशानी आनंद आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राम्हणवाडा थडीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलिस हवालदार अमोल राऊत, राजू मरस्कोल्हे, हेमंत येरखडे आणि पोलिस शिपाई अनुप मानकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button