
प्रतिनिधी- तळेगाव दाभाडे शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले. त्यावेळी चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दोघांनी गोळीबार केला तर इतर दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ त्याच ठिकाणी थांबले होते. जखमी अवस्थेत आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांची समाजाशी नाळ जोडली होती.
आवारे सहा वर्षापूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. किशोर आवारे यांच्या प्राणघात हल्ला झाल्याची घटना समजताच
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमुळे तळेगाव शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. किशोर आवारेंचा गोळीबार करून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.



