महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड शहर बंदची हाक देण्यात आली, सर्व पक्ष संघटनांचा बंदला पाठींबा..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि.०६ सप्टेंबर २०२३ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड शहर बंद,
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने विविध आंदोलने करत आहे. लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेले ५८ मूक मोर्चे महाराष्ट्राने व जगाने पाहिले आहेत. या मागणीसाठी आजवर ४२च्या वर मराठा तरुणांनी आत्मबलिदान दिले आहे; परंतु ही न्यायीक मागणी आजवर कोणतेही सरकार
पूर्ण करू शकले नाही. मराठा समाजाला कुणावरही अन्याय न करता कोर्टात टिकणारे आरक्षण ओ.बी.सी. प्रवर्गातून हवे आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज
जरांगे पाटील व सहकारी संविधानाने दिलेल्या अधिकारात शांततेत आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो माता भगिनी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग उपस्थित होता. सदर आंदोलन उधळून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला हवेत
गोळीबार केला. यामध्ये शेकडो माता-भगिनी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आंदोलक जखमी झाले. यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
यामधून आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये, शहरातील व्यापारी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा सांगतांना असे नमूद केले आहे. की शनिवारी सकाळी १० वाजता पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शांततेत आंदोलनास सुरूवात होणार आहे. सर्व आंदोलक व समाज बांधव पिंपरीगाव येथून पायी मोर्चाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भिमसृष्टी पिंपरी येथे जाणार आहेत. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून धरणे व निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनाची समाप्ती
याच ठिकाणी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाने खालील प्रमुख मागण्या केलेल्या आहेत.
१) मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गातून आरक्षण द्यावे,
२) जातीनिहाय जनगणना करावी,
३) एकाच पक्षाचे असलेले केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने हालचाली करून आरक्षण मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत.
४) मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे.
५) समाजाची दिशाभूल करू
नये.
६) आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी राज्य सरकारने करावी.
७) सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी,
८) अमानुष लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी राजीनामा द्यावा.
९) मराठा आरक्षण आंदोलकावर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

या आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहरातील भाजपा व शिवसेना शिंदे गटा व्यतिरिक्त विविध पक्ष, संघटनांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. असे मराठा क्रांती मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगीतले. यावेळी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), आम आदमी पार्टी, एम. आय. एम. मनसे, रिपब्लिकन सेना, अशा सर्व पक्ष संघटना उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!