महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन संपन्न..
पिंपरी चिंचवड दि. २३ फेब्रुवारी २०२४ शहरातील नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिका नेहमी कटिबद्ध आहे. यामध्ये वैद्यकीय विभाग हा महत्वाचा घटक असून महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी महापालिकेस शहरातील विविध कंपन्यांचे सहकार्य लाभत आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून थेरगाव हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेले अत्याधुनिक सुविधांनी सज्ज शस्त्रक्रिया गृह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी इंडियाच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन समारंभास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मनोजित हालदार, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, अजिंक्य येळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, थेरगाव रुग्णालय प्रमुख डॉ. राजेंद्र फिरके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी इंडियाचे उपाध्यक्ष युवराज दयानंद, विपणन प्रमुख रवि अरोरा, सीएसआर विशेतज्ञ शेरील शंकर तसेच थेरगाव रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, महापालिका शाळांमध्ये तसेच रुग्णालयांमध्ये आणि शहरातील विविध भागांमध्ये सीएसआर निधीच्या माध्यमातून अनेक विकासकामांमध्ये मदत झाली आहेत. निधीसोबत महापालिकेस अनुभवी तज्ञ तसेच नवनवीन कल्पनाही या कंपन्यांच्या माध्यमातून भेटत आहेत. यापुढेही सँडविक मायनिंग अँड रॉक टेक्नॉलॉजी इंडिया सारख्या कंपन्यांचे सहकार्य सीएसआर निधीच्या माध्यमातून महापालिकेस लाभेल अशी आशा आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे म्हणाले, थेरगाव रुग्णालयातील अनेक सोयीसुविधा सीएसआर निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या काळात महापालिका ट्रॉमा युनिट, पीपीपी तत्वावर कॅन्सर युनिट तसेच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, प्लास्टिक सर्जरी युनिट तसेच युरोलॉजी युनिट उभारण्याचा विचार करत आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसेच या अनुषंगाने शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा अल्प दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापालिकेच्या या उपक्रमात शहरातील विविध कंपन्यांचे सहकार्य सीएसआर निधीच्या माध्यमातून लाभत आहे ही शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे, असेही आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे म्हणाले.