जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त भोसरीत जनजागृती उपक्रमडॉ. काटे डेंटल केअर अँड इंप्लांट सेंटरचा सकारात्मक, समाजोपयोगी पुढाकार..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०१ जून २०२५ जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून डॉ. काटे डेंटल केअर अँड इंप्लांट सेंटर, भोसरी यांच्या वतीने भोसरी व परिसरात व्यापक तंबाखूविरोधी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू, विमल, सुपारी, मिश्री यासारख्या व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगणारे माहितीपट मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून विविध परिसरांतील चौकाचौकांत दाखवण्यात आले.
या व्हिडिओंमध्ये तंबाखू सेवनामुळे कॅन्सर झालेल्या रुग्णांचे वास्तवदर्शी अनुभव, त्यांच्या कुटुंबीयांचे हाल, तसेच कॅन्सरमुळे उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यांची जिवंत उदाहरणे लोकांसमोर मांडण्यात आली. या थेट आणि प्रभावी माध्यमातून व्यसनांचे भीषण परिणाम अधिक प्रभावीपणे समोर आले आणि उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम झाला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विशेषतः तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे, त्यांचे भान जागवणे आणि समाजात आरोग्याविषयी सजगता वाढवणे, असा होता. या मोहिमेला भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
आज अनेकांना व्यसनांचे दुष्परिणाम माहिती असले तरी, व्यसनमुक्त होण्यासाठी नेमके काय करावे, कुठून सुरुवात करावी, हे माहीत नसते. या गरजेतून डॉ. प्रांजली काटे आणि डॉ. किर्तीराज दिलीप काटे यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून, व्यसनमुक्तीसाठी आवश्यक उपाय, सल्ले व मार्गदर्शन करणारे माहितीपट तयार करून जनतेसमोर सादर केला.
हा उपक्रम फक्त माहिती पुरता न राहता, अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारा ठरला आहे. अशा समाजोपयोगी आणि आरोग्याभिमुख उपक्रमांमुळे आरोग्यविषयक जनजागृतीस चालना मिळत असून, हे कार्य इतर आरोग्यसेवक आणि दंतचिकित्सकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



