जानोरी गावात गणपती उत्सवानिमित्त जिवंत देखावे बघण्यासाठी अलोट गर्दी..

प्रतिनिधी रेणूका गायकवाड-महाले नाशिक दि. ०५ सप्टेंबर २०२५ दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात अनेक वर्षा पासून गावात जीवांत देखावे दाखवण्याची परंपरा असून, जानोरी हे गाव बारा ते पंधरा हजार लोकसंख्येचे असून या गावात अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात यामध्ये बोहडा व गणेश उत्सव हे दोन उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. जानोरी गावात दरवर्षी लहान-मोठे दहा ते पंधरा गणेश मंडळ असून हे गणेश मंडळ दरवर्षी पोलीस परवानगी व ग्रामपंचायत परवानगी घेऊन आप आपल्या परिसरांमध्ये मोठ मोठ्या बल्ल्या, बांबू उभे करून त्याला बारदान व ताडपत्री बांधून, किंवा अनेक प्रकारच्या वस्तू एकत्र करून स्टेज उभे केले जातात. नंतर त्या स्टेजवर गणपतीची मूर्ती स्थापन करून दहा दिवस मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. या उत्सवात प्रत्येक मंडळ दररोज रात्री वेगवेगळे जिवंत देखावे दाखवतात त्यामध्ये ऐतिहासिक, धार्मिक, संस्कृती, शैक्षणिक, स्वच्छता अभियान, शेतकऱ्यावर, सरकारवर, अशा अनेक विषयावर दररोज वेगवेगळे जिवंत देखावे या गावात दाखवले जातात. हे देखावे बघण्यासाठी आसपासच्या परिसरातील ओझर, मोहाडी, अंबे, शिवनही, वरवंडी, अक्राळे, खतवड संपूर्ण पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ जिवंत देखावे बघण्यासाठी येतात. त्यामुळे जानोरी गावात रात्रीच्या वेळेस यात्रेचे स्वरूप तयार होत आहे.



