अभिनंदनअमरावतीउत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

“निलेश जामठे लोकांचे प्रश्न स्वतःचे मानणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व”- प्रा.अरुण बुंदेले

कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान, संत रोहिदास बहुउद्देशीय संस्था, पे बॅक टू सोसायटी तर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन..

” मा.निलेश जामठे व मा. भास्करराव भटकर यांचा सत्कार संपन्न “

प्रतिनिधी अमरावती दि. २० ऑगस्ट २०२६ कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान, संत रोहिदास बहुउद्देशीय संस्था आणि पे बॅक टू द सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कुशल समाज संघटक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजाचे तडफदार नेतृत्व मा. निलेश जामठे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक व समाजप्रबोधनकर्ते भास्करराव भटकर यांच्या सन्मानार्थ आयोजित सत्कार सोहळा आनंद सेलिब्रेशन हॉल, कठोरा रोड, अमरावती येथे दि.१३ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. अरुण बुंदेले म्हणाले की, ” निलेश जामठे हे लोकांचे प्रश्न स्वतःचे मानून कार्य करणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. गरीब आणि गरजू व्यक्तींच्या सुख-दुःखात सहभागी होणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण असून, समाजसेवेच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते गेल्या १३ वर्षांपासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयाराम तायडे होते. तर सत्कारमूर्ती म्हणून निलेश जामठे आणि भास्करराव भटकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी पुरुषोत्तम वनसकर आणि अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गुरु रविदास महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी निलेश जामठे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त तसेच भास्करराव भटकर यांना श्री गुरुदेव जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह तसेच प्रा.अरुण बुंदेले लिखित ‘निखारा’ हा काव्यसंग्रह आणि ‘दारूनं मेला व माय ‘ ही पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

“सत्कर्मातून पुण्य व पुण्यामुळे भाग्य उजळते” – निलेश जामठे

” पुण्य कमविणे म्हणजे वस्तू विकत घेणे नव्हे. यासाठी जीवन जगताना सत्कर्म करीत राहणे. कोणतेही कार्य करताना निस्वार्थ भावना, कुणाचेही मन दुखावणार नाही याची जाणीव, गरजवंतांना मदत करणे अशी थोडे थोडे सत्कर्म केल्याने तिळाप्रमाणे पुण्य लाभते आणि हेच पुण्य पुढे आपले भाग्य उजळण्यासाठी कामी पडते .” असे सत्कारमूर्ती निलेश जामठे यांनी सत्कराला उत्तर दिले.

” निलेश जामठे म्हणजे बेभान होऊन ध्येय प्राप्त करणारे व्यक्तिमत्व ” -पी.बी.वनसकर

” जीवनात ध्येय प्राप्तीसाठी सातत्य राखत जीवनात ध्येय निश्चित करा व बेभान होऊन ध्येय प्राप्त करा.असे बेभान होऊन ध्येय प्राप्त करणारे व्यक्तिमत्व म्हणजे निलेश जामठे होतं. सोशल मीडियामुळे मुलाच्या संस्कारावर आघात होत असून त्यापासून दूर राहिले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके पालकासमवेत वाचावित यातून ज्ञानवृद्धी होते. “असे प्रतिपादन प्रमुख अतिथी पी.बी.वनसकर यांनी केले.

” निलेश जामठे समाजाचे तरुण तडफदार नेतृत्व ” – दयाराम तायडे

   " निलेश जामठे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष होण्यापूर्वी पासूनच समाजाची सेवा करीत आलेले आहेत. आज ते समाजाचे एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून नावारुपास येत आहेत. समाज मनामध्ये प्रवेश करून समाजसेवा करणारे समाजसेवक म्हणजे निलेश जामठे आहेत. त्यांचे मी अभिष्टचिंतन करतो." असे विचार सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष दयाराम तायडे यांनी व्यक्त केले.

” निलेश जामठे एक आदर्श व्यक्तिमत्व”- भास्करराव भटकर

  " जीवन जगत असताना थोर पुरुषांच्या चरित्राचे वाचन केले पाहिजे. असे वाचन केल्यास समाजात जागृती निर्माण होईल. समाजाची प्रगती होईल अशी समाजाची प्रगती करणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आजचे सत्कारमूर्ती निलेश जामठे होतं." असे विचार भास्करराव भटकर यांनी व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.जी.गोंडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शेगोकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पांडुरंग धुमाळे यांनी केले. याप्रसंगी डॉ. नंदकिशोर खंडारे, उत्तमराव तायडे, प्र.ना. मोहोकार, सुखदेव नाठे, ज्ञानेश्वर बुंदिले, राजेंद्र दहिकर, आशीष तायडे, अरुण शेगेकर आणि पांडुरंग ढाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर संत रोहिदास बहुउद्देशीय संस्था आणि पे बॅक टू द सोसायटीची सभा संपन्न झाली. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!