
प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. ०६ मार्च २०२६ शेवगांव पाथर्डी (अहिल्यानगर) सविस्तर वृत्त असे की पाथर्डी येथील श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लिमिटेड या संस्थेत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांनी आपले पैसे परत न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला असून, न्याय मिळावा व फरार भामटे संचालक मयुर वैद्य आणि नितीन तुपे यांना त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात ठेवीदारांनी पाथर्डी पोलीस निरीक्षकांना आपली व्यथा मांडली आहे. संबंधित संस्थेच्या पाथर्डी शाखेत अनेक ठेवीदारांनी बचत व मुदत ठेवी स्वरूपात रक्कम जमा केली होती. मात्र गेल्या एक ते दीड वर्षांपासून ठेवींच्या मुदती संपूनही वारंवार मागणी करूनही ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील पैसे परत दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठेवीदारांनी शाखा अधिकाऱ्यांशी अनेकदा संपर्क साधून लेखी विनंतीदेखील केली. तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊनही बराच कालावधी उलटून गेला तरी गुन्हा दाखल होऊन तक्रार नोंदवली जात नसल्याचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ठेवीदारांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे घोर फसवणूक झाल्यानं न्याय मिळावा, ठेवीची रक्कम परत मिळावी आणि संबंधितांवर कडक फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी ठेवीदारांनी ५ मार्च २०२६ पासून पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने संचालकांच्या पाळलेल्या गुंडांपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवावा, अशी मागणीही ठेवीदारांनी आपल्या निवेदनात केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून ठेवीदारांना न्याय मिळणार का ??? आणि संबंधित संस्थेवर प्रशासन कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



